भाजप नेते किरण जाधव यांनी घेतली महानगरपालिका आयुक्तांची भेट
भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी, नव्याने रुजू झालेल्या बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच शुभेच्छा दिल्या.
किरण जाधव यांनी यावेळी महापालिका आयुक्तांशी शहर आणि उपनगरातील विविध विषयांवर चर्चा केली. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील मूलभूत समस्या मांडून त्या समस्यांच्या निवारणाची मागणी केली.
बेळगाव शहर परिसरात डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक औषधांची फवारणी करावी, बंद पडलेली शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ववत सुरू करून रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध करून द्यावी तसेच महापालिकेने शव सेवेसाठी पुरेशा शववाहिका खरेदी कराव्यात, अशी मागणी किरण जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
बेळगाव महापालिकेकडे पुरेशा शववाहीका उपलब्ध नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेने पुरेशा शववाहीका खरेदी कराव्यात. शववाहिका खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे असेल तर महापालिकेने सेवाभावी संस्थांना आवाहन करून देणगीरूपाने सेवाभावी संघटनांकडून शववाहिका उपलब्ध करून घ्याव्यात, असे किरण जाधव म्हणाले.
शहरातील अस्वच्छता आणि गढूळ वातावरणामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकूनगुणिया सारख्या रोगांनी उच्छाद मांडला आहे. याची दखल घेत महापालिका आरोग्य विभागाने, खरेदी केलेल्या फॉग मशीनचा सुरळीत वापर करून शहर आणि उपनगरात जंतुनाशक औषधांची फवारणी करावी.
तसेच बेळगाव शहर आणि परिसरातील बंद पडलेले सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ववत सुरू करून लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही किरण जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी यावेळी बोलताना समस्यांची पाहणी करून समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.