बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई – सहा जणांना अटक, ५० किलो गांजा आणि तीन कार जप्त
बेळगाव :
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत बेळगाव पोलिसांनी मोठा धडक छापा टाकत ५० किलो गांजा, तीन कार आणि इतर साहित्य जप्त करून सहा जणांना अटक केली. ही माहिती पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगाव–वेंगुर्ला मार्गावरील सुळगा (हिं.) येथे हॉटेलजवळ संशयित कार थांबवून तपासणी केली असता हे रॅकेट उघडकीस आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये –इस्माईल उर्फ सद्दाम बाबू सय्यद (३५, कणगला),ताजीर गुडूसाब बस्तवाडे (२९, कणगला),प्रथमेश दिलीप लाड (२९, गडहिंग्लज, कोल्हापूर),तेजस भीमराव वाजरे (२१, कणगला),शिवकुमार बाळकृष्ण असबे (२९, महागाव),रमजान दस्तगीर जमादार (३४, कणगला, सध्या सातारा).त्यांच्याकडून १० मोबाईल फोन, एक चाकू, वजनकाटे, ४ हजार रुपये रोख, तसेच तीन कार जप्त करण्यात आल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार इस्माईल उर्फ सद्दाम हा या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार असून तो मध्य प्रदेश व ओडिशा मधून गांजा आणून विकत होता. तसेच पुणे व मुंबईत हेरॉईन पुरवठा करण्याचाही त्याचा डाव होता.
ही कारवाई पोलिस निरीक्षक बी.आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे त्यांनी तपासाची आखणी केली आणि अखेर या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात यश मिळवले. या धाडसी कारवाईसाठी संबंधित पथकाला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.