बेळगाव – उत्तर कर्नाटक विकासाला दिशा मिळावी यासाठी सुवर्णसोध बांधण्यात आले. या ठिकाणी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. हिवाळी अधिवेशन माध्यमातून या भागाचा विकास अपेक्षा फोल ठरली आहे.हिवाळी अधिवेशन टुरिंग टॉकीजची सैर बनली असल्याची टीका, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी विधानसभेत बोलताना केली.
उत्तर कर्नाटक विकास विषयावरील चर्चेत भाग घेताना अभय पाटील पुढे म्हणाले,बेळगावात सुवर्णसौध बांधण्यात आले तरीही या भागावर अन्याय कायम आहे. सुवर्णसौध सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हा आणि तालुकास्तरावरील कार्यालय हलवून या ठिकाणचे महत्त्व घालवून टाकले आहे. हिवाळी अधिवेशनात दक्षिण कर्नाटकातील आमदारांची उपस्थिती नगण्य दिसून येते. सभागृहात मंत्री आणि अधिकाऱ्यांची हजेरी कमीच असते. हिवाळी अधिवेशन अनेकांसाठी गोवा सहलीची पर्वणी ठरले आहे.वारंवार मागणी करूनही सुवर्णसौध मध्ये प्रशासकीय कार्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत.
हिवाळी अधिवेशन वगळता अन्यवेळी वर्षभर सुवर्णसौध म्हणजे भूत बंगलाच बनलेला असतो.
याचा विचार करून पुढील काळात सुवर्णसोध मध्ये विविध समितींच्या बैठका घेण्यात याव्यात. प्रत्येक महिन्याला कॅबिनेट बैठका घेण्यात याव्यात.राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमेलने व्हावीत. तरच सुवर्णसौध आणि हिवाळी अधिवेशनाचे महत्त्व दिसून येईल असेही अभय पाटील यांनी सांगितले.