नवरत्न सन्मानाने,बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याची उत्साहात सांगता.
बेळगाव – गेली 22 वर्ष सुरू असलेल्या आणि बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा आज समारोप झाला. आज बुधवारी सायंकाळी गुडघे रोड येथील श्री माता सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नवरत्न सत्कार सोहळ्यात, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवरत्नांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शनिवार दिनांक 2 सप्टेंबर पासून यावर्षीच्या श्री गणेश फेस्टिवलला सुरुवात झाली होती. गेले चार दिवस महिलांच्या स्पर्धा तसेच एकांकिका नाट्यप्रयोगानंतर आज गणेश फेस्टिवलच्या अंतिम दिवशी नवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी वीरेश हिरेमठ (समाजसेवक), सुधीर जोगळेकर (साहित्यरत्न),अभिजीत कालेकर (नाट्यभूषण),साजिद खलिफा (संगीतरत्न), दीपक धडोती (उद्योगरत्न),कुमारी रोहिणी पाटील (क्रीडा रत्न), अशोक गजानन जाधव (श्रमसेवा), अंबाप्रसाद नेरलीकर (कृषिरत्न) व सामाजिक संस्थेचा पुरस्कार आश्रय फाउंडेशन ला बहाल करण्यात आला.
गणेश फेस्टिवल समितीचे अध्यक्ष मनोहर देसाई, चिटणीस चंद्रकांत पाटील, संजीव नेगिनहाळ,भक्ती डॉ. मीना पाटील, रूपाली जनाज, श्रीकांत काकतीकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते नवरत्नांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ,प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी दीपक धडोती, सुधीर जोगळेकर आणि वीरेश हिरेमठ यांनी सन्मानासंदर्भात कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर मीना पाटील व रूपाली जनाज यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले.उपस्थितांचे स्वागत श्रीकांत काकतीकर यांनी केले. प्रस्ताविक मनोहर देसाई यांनी केले.आभार विलास आध्यापक यांनी मानले. सूत्रसंचालन अक्षता यांनी केले. कार्यक्रमाला श्री माता सोसायटी, श्री राजमाता सोसायटी, श्री भक्ती सोसायटीचे संचालक पदाधिकारी, ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेच्या शिक्षिका कार्यकारी वर्ग तसेच गणेश भक्तांनी मोठी उपस्थिती दर्शविली.