फक्त 500 रुपयांच्या वाटणीवरून बेळगावात खून; दोघे आरोपी अटकेत
बेळगाव : केवळ 500 रुपयांच्या वाटणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव हुसेन गौससाब तासेवाले (वय 45, रा. प्रताप गल्ली, येळ्ळूर) असे असून, अटक केलेले आरोपी मिथुन महादेव कुगजी आणि मनोज चांगाप्पा इंगळे (दोघेही रा. येळ्ळूर) आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन तासेवाले यांनी परमेश्वरनगर, येळ्ळूर येथून भंगार (स्क्रॅप) गोळा करून विकले होते. यातून मिळालेल्या 500 रुपयांच्या रकमेतील आपली वाटणी मागण्यासाठी मनोज आणि मिथुन हे दोघे शनिवारी रात्री हुसेन यांच्या घरी गेले. पैशांवरून झालेल्या तीव्र वादात दोघांनी मिळून हुसेन यांना मारहाण केली.
मारहाणीदरम्यान गुप्तांगावर गंभीर मार लागल्याने हुसेन यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
पैशाच्या केवळ 500 रुपयांच्या रकमेवरून प्राणघातक हल्ला करून मित्राचा जीव घेण्याच्या या घटनेने येळ्ळूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.