बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टतर्फे ‘श्रावण संभ्रम’ उत्सवाचे भव्य आयोजन
बेळगाव : श्रावण महिन्याच्या स्वागताला वेगळ्या उत्सवी वाणाने रंगत आणत, बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्ट, बेळगाव यांच्या वतीने ‘श्रावण संभ्रम’ या विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमाला शुक्रवारी रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर अनगोळ येथे उत्साहात सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंख इंडिया फाउंडेशनच्या गौरी मांजरेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘श्रावण संभ्रम’ला औपचारिक प्रारंभ देण्यात आला.
मुख्य अतिथी म्हणून गौरी मांजरेकर, संकेत मांजरेकर, अनुश्री देशपांडे, आनंद कुलकर्णी, विलास बदामी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे, उपाध्यक्ष भारत देशपांडे, आर. एस. कुलकर्णी, श्रीदेवी कुलकर्णी व चंद्रशेखर नवलगुंद यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष उर्जा लाभली.
सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू असणाऱ्या या प्रदर्शनात स्थानिक उद्योजक, महिला बचतगट तसेच पारंपरिक हस्तकला व विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शने मांडण्यात आली आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम व पारंपरिक उपक्रमामुळे श्रावणोत्सवाला सामुदायिक रंगत आली आहे.
‘श्रावण संभ्रम’च्या निमित्ताने समाजबांधवांना एकत्र आणून सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीचा सेतू बांधण्याचा प्रयत्न समाज ट्रस्टतर्फे करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.