वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर बेळगाव-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसची स्वप्नपूर्ती
बेळगाव : अखेर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर बेळगाव-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसचे स्वप्न रविवारी साकार झाले. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून या गाडीचा शुभारंभ केला, तर रात्री ८:३० वाजता बेळगाव स्थानकात खासदार जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या वेळी राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, माजी खासदार मंगला अंगडी, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार संजय पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानकावर भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून रेल्वेचे जल्लोषात स्वागत केले. प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले, तर नवी वंदे भारत पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
गेल्या वर्षभरापासून या मार्गावरील वंदे भारत सेवेची मागणी होत होती. हुबळी-बेंगळुरू वंदे भारत सुरू झाल्यानंतर ही सेवा बेळगावपर्यंत वाढवावी, अशी मागणी सातत्याने होत होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे उद्घाटन वारंवार लांबणीवर जात होते. यामुळे बेळगाव-हुबळी राजकारणात चांगलाच कल्लोळ माजला होता आणि हुबळीच्या खासदारांवर बेळगाववर अन्याय केल्याचे आरोप झाले होते. अखेर खासदार जगदीश शेट्टर आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रयत्नांतून हा प्रश्न मार्गी लागला.
बेळगाव-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस पहाटे ५:२० वाजता बेळगावहून सुटून दुपारी १:५० वाजता बेंगळुरूला पोहोचेल. दुपारी २:२० वाजता बेंगळुरूहून परतीचा प्रवास सुरू होऊन रात्री १०:४० वाजता बेळगावात दाखल होईल. एसी एक्झिक्युटिव्ह चेअर तिकीट दर २,९३० रुपये तर एसी चेअर कारचे तिकीट दर १,६३० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. विमानाशिवाय जलद प्रवासासाठी ही सेवा बेळगावकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमात बोलताना खासदार शेट्टर यांनी या प्रकल्पासाठी आलेल्या अडचणी, झालेल्या अनेक बैठका आणि केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. त्यांनी ही सेवा सुरू होणे हे बेळगावकरांच्या सातत्यपूर्ण मागणीचे आणि संयुक्त प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद केले.