किरकोळ घटना वगळता महाराष्ट्रात शांततेत मतदान
मुंबई:महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बुधवार 20 नोव्हेंबर रोजी किरकोळ घटना वगळता 288 विधानसभा जागांसाठी शांततेत सुरळीत मतदान पार पडले. राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.30% मतदान झाले होते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 70 टक्के तर मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले. प्राथमिक आकडेवारीनुसार तेरा मतदारसंघांमध्ये 70 टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन, शरद पवार , उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , प्रकाश आंबेडकर , देवेंद्र फडणवीस, अजित पवार , सुप्रिया सुळे, आदींसह अन्य नेत्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे आपल्या कुटुंबीयासमवेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे मतदान केले. मतदानानंतर त्यांनी आमचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार असा विश्वास व्यक्त केला. एक्झिट पोल मध्ये काटे की टक्कर दाखवण्यात येत आहे. मतदारांनी कुणाला कौल दिला हे 23 नोव्हेंबरला समजणार आहे. कुणाचा विजय होणार आणि कुणाचा पराभव होणार हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
मॅजिक फिगर
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी 145 हा मॅजिक फिगर आहे. काही काही एक्झिट पोल ने महाविकास आघाडी तसेच महायुतीला मॅजिक फिगर मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र खरे चित्र 23 रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत निवडणूक निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार की त्रिशंकू सरकार येणार असाही अंदाज वर्तवला गेला आहे.