**अरुणा गोजे-पाटील यांना “तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित**
बेळगाव ( रवी पाटील ) : ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षण समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “तेजस्विनी महाराष्ट्र सन्मान पुरस्कार” यंदा बेळगावच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, साहित्यिक आणि शिक्षणप्रेमी अरुणा गोजे-पाटील यांना प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सन्मान देण्यात आला.
अरुणा गोजे-पाटील या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव शाखेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्या तारांगण ग्रुपच्या प्रमुख आणि संदेश न्यूजच्या संपादक देखील आहेत. कुशल महिला संघटक म्हणून त्या ओळखल्या जातात. महिलांना साहित्याच्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी त्या सतत विविध बहुभाषिक काव्य संमेलन, साहित्य संमेलन व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करतात. तसेच, होम मिनिस्टर आणि अखिल भारतीय साहित्य परिषद या माध्यमातूनही त्यांनी महिलांना एकत्रित करून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत, त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.