बेळगाव :येथील प्रतिभावंत युवा कलाकार अनुष्का अक्षय आपटे हिने महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत आनंदमठ’ या संगीत नाटकातील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्य पदक पटकावले आहे. अनुष्काने बेळगावचा नावलौकिक वाढवताना सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले हे विशेष होय.
महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत आनंदमठ’ या नाटकाला एकूण आठ पुरस्कार मिळाले. सदर नाटकातील गायन आणि नृत्य यासारख्या आव्हानात्मक पैलूंमध्ये अनुष्का आपटे हिचा उत्कृष्ट अभिनय प्रेक्षकांना सहज भावून गेला. बेळगावच्या मराठी विद्यानिकेतन आणि बालिका आदर्श विद्यालयामध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या अनुष्काने आरपीडी महाविद्यालयात द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेऊन पुढे पुण्यामध्ये रानडे महाविद्यालयातून कला शाखेची पदवी संपादन केली आहे. बालपणापासून रंगभूमीची आवड असलेल्या अनुष्का हिने संगीत सौभद्र, संगीत शारदा, संगीत स्वयंवर आणि इतर अनेक प्रसिद्ध नाटकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अनुष्का ही कामगार नेते कै. राम आपटे यांची नात तसेच गोव्याच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कायदा विभाग प्रमुख ॲड. अक्षय आपटे व बुक लव्हर्स क्लबच्या उपाध्यक्षा आरती आपटे यांची कन्या आहे. उपरोक्त यशाबद्दल अनुष्का हिचे नाट्य क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.