बेंगळुर:दिनांक २३ जुन २०२४ रोजी भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी केंद्रीय अवजड (मोठ्या) उद्योगमंत्री माननीय एच.डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि एक अवजड (मोठ्या) औद्योगिक युनिट स्थापन करण्यासाठी निवेदन सादर केले.
या संदर्भात अनिल बेनके यांनी मंत्र्यांशी चर्चा केली की, बेळगांव हे भारतातील औद्योगिक विकासात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. त्याच्या अंगभूत क्षमतांसह आणि उद्योजक नागरिकांसह, बेळगांव हे गुंतवणुकीच्या संधीसाठी एक आदर्श पर्याय आहे.
बेळगांवमध्ये अनेक उद्योग आहेत, प्रामुख्याने हायड्रॉलिक आणि फाउंड्री उद्योग हे सर्वात महत्वाचे आहेत, जे अन्नधान्य, ऊस, कापूस, तंबाखू, तेलबिया आणि दुग्धजन्य पदार्थांचे व्यापार केंद्र म्हणून काम करतात. मुख्यतः मौल्यवान धातू, खनिजे, सिलिका जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे सिमेंट, पॉवरलूम इत्यादी कारखान्यांसाठी योग्य क्षेत्र आहे.
शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगांवमध्ये नामांकित विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये, तांत्रिक संस्था, पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये आहेत त्यामुळे मनुष्यबळाची कोणतीही समस्या नाही आणि शहराच्या आजूबाजूला सरकारी जमीन आहे.जी रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आहे. सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत. मुख्यतः बेळगांवातील तरुण कलागुणांना रोजगाराच्या
संधी उपलब्ध होतील, त्यामुळे बेळगावात अवजड (मोठ्या) औद्योगिक युनिट स्थापन करण्यावर भर दिला असून बेळगांवात येऊन जागेची पाहणी करुन लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली.माननीय केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.