बेळगाव :सरकारच्या योजनांमुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जीवनमान सुधारले पाहिजे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कुपोषण दूर करण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडीतील बालके आणि गर्भवती महिलांना अंडी वाटप करण्यात येतात. मात्र, गेल्या ६ महिन्यांपासून अंडी खरेदीसाठी निधीच न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांना अंड्यांचा खर्च स्वतःच करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील ६६,५१३ अंगणवाडी केंद्रांमध्ये एकूण ३९,५०,१७९ विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील ५,६५६ अंगणवाडी केंद्रांमध्ये ३,७९,७०४ विद्यार्थी लाभार्थी आहेत. पण, निधीअभावी त्यांच्यासाठी रोज अंड्यांचे नियोजन करताना अंगणवाडी सेविकांना कसरत करावी लागत आहे. स्थानिक पातळीवर अंडी खरेदी करावी लागत असल्याने स्वतःकडील पैसे घालून अंड्यांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. अंडी खरेदीसाठी निधी उपलब्ध होण्यास उशीर झाल्यामुळे, अंगणवाडी सेविका अंडी खरेदी आणि वितरणासाठी कर्ज घेत आहेत.
काही अंगणवाडी सेविकांनी ही बाब महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. याबाबत अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, अधिकारी वेळ मारून नेत आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीसह विभागाची इतर कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागतात. मात्र अंडी खरेदीसाठी निधी मिळत नसल्याने हे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.