बेंगळूर येथे मराठा समाजाच्या हितोन्नतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीला समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. गोसाई मठाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक तसेच जातीय जनगणनेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला आमदार श्रीनिवास माने, विधानपरिषद सदस्य डॉ. मारुतीराव मुळे, मंत्री संतोष लाड, माजी मंत्री पीजीआर सिंधिया, कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष सुरेशराव साठे, शामसुंदर गायकवाड, केसरकर, तसेच बेळगाव मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांच्यासह राज्यभरातील मराठा समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सिद्धरामय्या सरकारने जाहीर केलेल्या जातीय जनगणनेला लवकरच प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने समाजबांधवांनी जनगणनेत मातृभाषा रकान्यात ‘मराठी’, धर्म रकान्यात ‘हिंदू’ तर जात रकान्यात ‘मराठा’ व उपजात रकान्यात ‘कुणबी’ असा स्पष्ट उल्लेख करावा, असा ठराव या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला.
बैठकीत जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिपत्रक वाटप करून आणि बैठका आयोजित करून समाजबांधवांपर्यंत ही बाब पोहोचवावी, अशी भूमिका घेण्यात आली. किरण जाधव यांनी बोलताना “22 सप्टेंबरपासून जनगणना सुरू होत आहे. त्यामुळे समाजाने जागरूकतेने व एकसंधतेने सहभाग नोंदवावा,” असे आवाहन केले.
या प्रसंगी मंजुनाथ स्वामीजींसह सुरेशराव साठे, शामसुंदर गायकवाड, किरण जाधव, नागेश देसाई, विनायक कदम, धनंजय जाधव यांसारख्या मान्यवरांनी विचार मांडले.
ही बैठक मराठा समाजाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आणि जातीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.