*अगसगे येथील महालक्ष्मी देवी यात्रेसाठी उत्साहाचे वातावरण*
बेळगाव, ता. ८: तालुक्यातील अगसगे गावात श्री महालक्ष्मी देवी यात्रेचे आयोजन करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. अनेक वर्षांनंतर ही यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गावातील ज्येष्ठ व तरुणांनी सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांसोबत मंगलमय वातावरण निर्माण केले. यात्रेची अंतिम तारीख अजून जाहीर नसली तरी, देवीच्या पूजनासाठी मंगळवार (ता. ८) रोजी गावात विधिवत कार्यक्रम पार पडला.
सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत लक्ष्मी मंदिरात देवस्थान पंच आणि सुवासिनी महिलांनी देवीची ओटी भरून पूजा-अर्चा केली. त्यानंतर रेडा व पालव्याची पूजा करून धनगरी ढोल, हलगी, तसेच मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणूक गावभर काढण्यात आली. ग्रामस्थ, भजनी मंडळ, युवक मंडळ, देवस्थान पंच, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी उत्साहात मिरवणुकीत भाग घेतला. प्रत्येक घरासमोर रेडा-पालव्याची ओवाळणी करण्यात आली तर भंडाऱ्याची उधळण करून जयघोष ही करण्यात आला.https://dmedia24.com/successful-success-in-the-second-year-examination-results-of-gsp-uu-college/
गावातील प्रत्येक गल्लीतून मिरवणूक नेताना सर्व मंदिरांसमोर पूजा केल्या गेल्या. अनेक वर्षांनंतर यात्रेच्या आयोजनामुळे तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, तर ज्येष्ठ नागरिकांनीही यात भरघोस सहभाग दिला. मिरवणुकीची सांगता लक्ष्मी मंदिरात गाऱ्हाणे घालून करण्यात आली, यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे अक्त सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य, मानकरी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात एकात्मता आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले.