बेळगाव:येथील जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने येत्या 28 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी सोमवारी कॉलेजमधील रानडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जी एस एस महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून व्यवस्थापन, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी ही गौरवाची बाब आहे. याबाबतची माहिती माझी विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे 28 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर सक्सेरियन्स 24- रीकनेक्ट अँड रिजॉईस या नावाचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे.
महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे तसेच सर्वांसाठी आनंदाचा सुवर्णक्षण आहे. त्यानिमित्त या आनंदामध्ये सहभागी होण्याबरोबरच जुन्या मित्र-मैत्रिणींना आपल्या महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा भेटता यावे आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देता यावा यासाठीच स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.
या स्नेह मेळाव्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचपासून यंदाच्या बॅचपर्यंतचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यासाठी स्नेह मेळावा समिती स्थापन केली आहे. त्याअनुषंगाने पुढील नियोजन केले जात आहे. जेणेकरून विविध माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. किती विद्यार्थी सहभागी होतील असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी होतील असा अंदाज आहे.
विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक भरत तोपिनकट्टी म्हणाले, सदर स्नेह मेळावा सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे.
त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये नाव नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 11 ते 12 या दरम्यान उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी माजी प्राचार्य आणि प्राध्यापकांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारी बारा ते अडीच वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणींचा आनंद घेता येणार आहे. तसेच पुन्हा एकत्र भेटण्याचा देखील आनंद घेता येणार आहे. त्यासाठी बॅचनिहाय वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे. दुपारी 3.30 नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ज्याद्वारे माजी विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देता येईल.
यावेळी स्नेह मेळावा समितीचे प्रमुख कुलदीप हंगिरगेकर म्हणाले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकत्र येण्याची चांगली संधी आहे. हा स्नेहसंमेलनाचा सोहळा अविस्मरणीय आणि अद्भुत व्हावा यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. आतापर्यंत आमच्याकडे अनेकांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी प्रभारी प्राचार्य अभय सामंत, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. संदीप देशपांडे, स्नेहा मेळावा समितीचे सचिव अनिल खांडेकर, समीना बेग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.