बेळगाव:मधुमेहामुळे गेल्या ४ दिवसांपासून प्रकृती बिघडलेल्या रुग्णास रुग्णालयात उपचार करण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र माजी लोकप्रतिनिधींनी बिम्स प्रशासनाची हजेरी घेताच त्यांच्या उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे.
कन्नड सक्ती आंदोलनातील बेळगुंदी येथील हुतात्मा कै .भावकू चव्हाण यांचे चिरंजीव असणारे शटूप्पा चव्हाण हे आपल्या घरातील दोन म्हशी विकून उपचार घेण्यासाठी इस्पितळात दाखल झाले आहेत.
शट्टूप्पा चव्हाण हे स्थानिक पातळीवर उपचार घेत होते. मात्र मधुमेहामुळे त्यांच्या पायात पू भरल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराचा फटका त्यांना बसला. यावेळी शट्टूप्पा चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली.
दरम्यान माजी महापौर शिवाजी सुंठकर, एपीएमसीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, सुळगा ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांनी हस्तक्षेप करून संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र याठिकाणी असलेले डॉ. अजित वांद्रे यांनी फोनवरून अरेरावीची उद्धट भाषा केल्याने संतापलेल्या शिवाजी सुंठकर यांच्यासह आणखी काही नागरिकांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी डॉ.अजित वांद्रे आणि येथील उपस्थित कर्मचाऱ्यांची झडती घेतल्यानंतर थेट बीम्सच्या वैद्यकीय संचालकांशी संपर्क साधण्यात आला. वरिष्ठांनी व मंत्र्यांनी त्यांना चांगलेच खडसावले. तसेच त्या ठिकाणी दुसऱ्या डॉक्टरांची नियुक्ती करून शट्टूप्पा चव्हाण यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली.
मधुमेहामुळे गेल्या ४ दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने शट्टूप्पा चव्हाण हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत .त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.