ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू
बेळगाव:
कर्णकर्कश आवाज करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकी वाहनांवर सक्त कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे अशा वाहनांना ताब्यात घेऊन संबंधित वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. 15 जानेवारीपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये विशेष करून बुलेट वाहनांना जास्त टारगेट करण्यात आले आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या अशा वाहनांना बुधवारपासून ताब्यात घेऊन त्यांचे खराब झालेले सायलेन्सर बदलून नवीन सायलेन्सर घालण्याची सक्ती वाहन चालकांवर करण्यात आली आहे.
जे वाहन चालक याकडे दुर्लक्ष करत आहेत अशा वाहनचालकांची वाहने ताब्यात घेण्यात येत आहेत. तर जे वाहन चालक खराब झालेला सायलेन्सर बदलून नवीन सायलेन्सर वापरत आहेत त्यांना वाहने त्वरित ताब्यात दिली जात आहेत. बुधवारपासून अनेक वाहनांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.
त्यामुळे रहदारी पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत.
असे असलेतरी अचानक अशी कारवाई सुरू केल्याने वाहन चालकातून मात्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर वाहन चालवताना फोनवर बोलणाऱ्या आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. एकूणच आता दुचाकी वाहन चालकांना रहदारी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.