जिल्हा ब्राह्मण समाजाकडून दोन दिवसीय श्रावण उत्सवाचे आयोजन
बेळगाव प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्ट अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून गरजू विद्यार्थी व कुटुंबांना सातत्याने मदत पुरवत आहे. याच परंपरेत या वर्षी श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टतर्फे “श्रावण संभ्रम” हा भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
हा दोन दिवसीय उत्सव १६ व १७ ऑगस्ट रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात पार पडणार आहे. उद्घाटन समारंभ १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होईल. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध उद्योजिका सौ. गौरी मांजरेकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी टिळकवाडीच्या फ्रेंड सर्कल समूहाकडून पारंपरिक मंगळागौरी खेळांचे विशेष सादरीकरण होणार आहे.
या महोत्सवात ब्राह्मण समाजातील ७० हून अधिक उद्योजक व कारागीर सहभागी होत असून ५० पेक्षा जास्त स्टॉल्स उभारले जातील. कपडे, अलंकार, गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि सणासुदीच्या खरेदीसाठी लागणाऱ्या अनेक आकर्षक वस्तू येथे उपलब्ध राहतील.
खरेदीसोबतच कराओके संगीत, मुलांचा टॅलेंट हंट, महिलांसाठी खास स्पर्धा, विविध खेळ व बक्षिसांचे कार्यक्रम यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी हा सोहळा आनंददायी ठरणार आहे.
याशिवाय यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा उपक्रमही राबवला जाणार आहे.
दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा उत्सव सर्वांसाठी खुला असेल. स्थानिक कला-उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच समाजातील एकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करण्याची ही उत्तम संधी आहे, असे समाजट्रस्टचे अध्यक्ष रामा भंडारे, उपाध्यक्ष भरत देशपांडे व सचिव विलास बदामी यांनी सांगितले.