रायबाग मतदारसंघात रस्ते विकासासाठी तब्बल २५ कोटींचा अनुदान – प्रियांका जारकीहोळी
रायबाग :
रायबाग मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षेनुसार रस्ते विकासकामांना गती मिळाली आहे. लोकोपयोगी विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली.
बुधवारी तालुक्यातील भेंडवाड, रायबाग आणि जलालपूर या गावांमध्ये रस्ते डांबरीकरणाच्या कामांना सुरुवात झाली. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या, “४ कोटी ३० लाख रुपयांत भेंडवाड–मेखळी रस्ता डांबरीकरण व विजेच्या दिव्यांची उभारणी, ७० लाखांत मंटूर–कटकबावी–देवापूरहट्टी रस्ता सुधारणा, १२ कोटींच्या निधीत रायबाग–कंकणवाडी रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण तसेच ३ कोटींच्या अनुदानातून भिरडी–बावनसौंदत्ती रस्ता डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. रात्री प्रवाशांना सोय व्हावी यासाठी रस्त्याच्या कडेला दिव्यांचीही सोय केली जाणार आहे.”
यावेळी आमदार डी.एम. आहोळे म्हणाले, “मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आमच्या मागणीला प्रतिसाद देत ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामस्थांनी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सहकार्य करावे, जेणेकरून दर्जेदार रस्त्यांची निर्मिती होईल.”
या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगुडे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष महावीर मोहिते, ग्रा.पं. अध्यक्षा अनीता दुपदाळे, पं.पं. अध्यक्ष अशोक अंगडी, जालालपूर ग्रा.पं. अध्यक्षा दीपा चौगला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.