राजहंसगडावर होणार ऐतिहासिक सोहळा : लाखो शिवभक्तांची गडावर होणार लगबग : सोहळ्याला उपस्थित राहण्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांचे शिवभक्तांना आवाहन
बेळगाव,
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंसगडावर प्रस्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य मूर्तीचे आज रविवारी उद्घाटन केले जाणार आहे. हा एक ऐतिहासिक सोहळाच ठरणार असून नागरिकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनावे असे आवाहन बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांनी केले आहे.
ध्वजारोहण झाल्यानंतर ढोल- ताशाच्या निनादात आणि शिवनामाच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे उद्घाटन केले जाणार आहे. यानिमित्त पोवाडा, डोळे दिपविणारा लेझर शो, क्रॅकर्स शो, मर्दानी खेळ असे कार्यक्रमही होणार आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला किमान एक लाखाहून अधिक शिवभक्तांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.
राजहंसगडावर भव्य दिव्य मूर्ती साकारावी आणि गडाचे सुशोभीकरण व्हावे यासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केले आणि अनेक दशकांचे स्वप्न पूर्णत्वास गेले. शासकीय अनुदान आणि व्यक्तीशः एक कोटी रुपये खर्चून राजहंसगडावर भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारणी गेली आणि गडाचे सुशोभीकरण झाले असून आज विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती उद्घाटन सोहळा पार पाडला जाणार आहे.
बेळगावच्या दक्षिणेस राजहंसाप्रमाणे उभा असणाऱ्या राजहंसगडाच्या सुशोभीकरणासाठी आणि गडावर भव्य दिव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी खूपच प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात बोलताना मात्र, मतदारसंघातील समर्थक व शिवप्रेमींनी याकरिता आपल्याला मोलाची साथ दिल्यानेच राजहंस गडावर भव्य शिवमूर्ती उभारू शकलो आणि आज हा ऐतिहासिक सोहळा होत असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.