किरण जाधव यांचे दानशूरांना आवाहन : प्रशांत हंडे यांना औषधोपचारासाठी सढळ हस्ते मदत करा : विमल फौंडेशनने केली 25 हजारांची मदत
बेळगाव : कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राजू हंडे हा युवक किडनी रोगाने त्रस्त होता. घरची परिस्थिती बिकट होती. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी घर खर्चासाठी आणि भविष्यासाठी जमविलेली रक्कम खर्ची घालून तसेच सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीतून किडनी ट्रान्सप्लांट करून घेतली. आई रेखा हंडे यांनी आपला मुलगा प्रशांत हंडे याला आपली किडनी दान केली.
किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर प्रशांत हंडे आणि किडनी (मूत्रपिंड) दान करणाऱ्या आई रेखा हंडे यांना आता दैनंदिन औषध- उपचारासाठी बराच आर्थिक खर्च करावा लागत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना हा खर्च न परवडणारा असून त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यांना औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चाच्या पुर्ततेकरिताकरिता कोनवाळ गल्ली भागातील हिरकणी महिला मंडळ सरसावले असून या मंडळाच्या अध्यक्ष साधना पाटील तसेच प्रभावती मोरे, मयूर नावगेकर यासह इतर सदस्यां प्रशांत हंडे आणि रेखा हंडे यांच्या औषध- उपचारासाठी मदत व्हावी यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींशी संपर्क साधत आहेत. हिरकणी महिला मंडळाच्या या आवाहनानुसार विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, भाजप युवा नेते आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी प्रशांत हंडे यांच्याकडे 25 हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.
प्रशांत हंडे आणि आई रेखा हंडे यांची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव आणि परिसरातील आर्थिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी. दानशूरांनी आर्थिक मदतीची रक्कम भारतीय स्टेट बँक, (एसबीआय) पाटील गल्ली, बेळगाव, शाखा बचत खाते क्रमांक : 39649227664 , IFSC : SBIN0040209 यावर जमा करावी, असे आवाहन विमल फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष किरण जाधव यांनी केले आहे.