रविवारी बेळगावात झालेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी जय महाराष्ट्र घोषणा दिल्यामुळे त्यांच्यावर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी,महापौर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कित्तूर कर्नाटक या कन्नड संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे.
पुतळ्याच्या ठिकाणचे काम अपूर्ण असताना आणि पुतळ्याच्या अनावरणाची परवानगी नसताना नियमांचे उल्लंघन करून अनावरण केल्याबद्दल कित्तूर कर्नाटक या संघटनेने निषेध केला आहे.केवळ राजकीय लाभ मिळवण्याच्या दृष्टीने पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना पुतळ्याच्या अनावरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
त्यांनी जय महाराष्ट्र अशी घोषणा देऊन राजद्रोह केला आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे .जय महाराष्ट्र घोषणा दिल्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापौर यांनी टाळ्या वाजवून कर्नाटकच्या जनतेचा अवमान केला आहे .यासाठी घोषणा देणारे मंत्री , लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.