उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
बेळगाव जिल्हयात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मतदान शांततेत पार पडले.जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदार संघातील १८७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला.काही मतदान केंद्रावर सकाळीच लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.पाऊस पडण्याची शक्यता आणि कडक ऊन्ह यामुळे बऱ्याच मतदारांनी सकाळीच मतदान करणे पसंद केले.बेळगाव दक्षिण,उत्तर , ग्रामीण आणि खानापूर मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीने राष्ट्रीय पक्षांच्या समोर कडवे आव्हान ठेवले आहे.भाजप,काँग्रेस, निजद,आप आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सकाळ पासून मतदारांना घरोघरी जाऊन मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले.अनेक ठिकाणी उमेदवारांनी मतदारांना नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती.सायंकाळी सहा वाजता मतदान संपले.
मतदान केंद्राच्या बाहेर दोन पेक्षा अधिक खुर्च्या घालून कार्यकर्ते बसलेले पाहिल्यावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पोलिसांना त्या खुर्च्या जप्त करायला लावल्या.
मतदान केंद्राच्या बाहेर प्रत्येक उमेदवाराला एक टेबल आणि दोन खुर्च्या घालण्याची परवानगी देण्यात आली होती.जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करत असताना वडगाव येथे दोन पेक्षा अधिक खुर्च्या घालून कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले .त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दोनपेक्षा जास्त असलेल्या खुर्च्या जप्त करायला लावल्या.जप्त केलेल्या खुर्च्या एका वाहनातून नेण्यात आल्या.मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांना देखील यावेळी पोलिसांनी तेथून हटवले.
यरझरवी गावात मतदान करण्यासाठी आलेल्या पारव्वा सिगनाळ (७०) या वृद्ध महिलेचे रक्तदाब कमी झाल्याने मतदान केंद्राच्या आवारात कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.नंतर तिच्या नातेवाईकांनी मृतदेह घरी नेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मतदान केंद्रात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता.मतदान संपल्यावर मतदान यंत्रे मतदान केंद्रातून पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आली.तेरा मे रोजी आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून मतदान यंत्रे तेथे कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत.