कर्नाटक राज्यातील पोलीस खाते हे अत्यंत शिस्तबद्ध आणि सक्षम खाते म्हणून ओळखले जाते.सेवा बजावताना जात,धर्म,विचार, यांचा विचार न करता निस्पृहपणे सेवा बजावावी असे आवाहन कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर.हितेंद्र यांनी केले .
कंग्राळी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या शपथविधी आणि दीक्षांत समारंभात ते बोलत होते.यावेळी आर.हितेंद्र यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांच्या विविध तुकड्याकडून मानवंदना स्वीकारून संचलनाचे निरीक्षण केले.
धैर्य आणि शिस्त या दोन गोष्टी पोलीस खात्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत .प्रशिक्षण कालावधीत संरक्षण करण्यासाठी मिळालेल्या प्रशिक्षणाचा,कायद्याच्या ज्ञानाचा सेवा बजावताना उपयोग होणार आहे .पोलीस खात्यात सेवा बजावताना आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते.पोलीस खात्याची गौरवशाली परंपरा जपण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे असे उदगार आर.हितेंद्र यांनी काढले.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांनी शानदार संचलन करून शपथ घेतली .प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रमेश बोरगावे यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांना शपथ दिली.विविध खेळात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पोलिसांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले.कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक एस.रवी,उप महानिरीक्षक एम. व्ही.रामकृष्ण प्रसाद,पोलीस आयुक्त डॉ.एम.बी. बोरलिंय्या,जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह पोलीस अधिकारी ,निमंत्रित आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते.