खानापूर (कर्नाटक) येथे १६ मे या दिवशी हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदू ऐक्याचा हुंकार !
खानापूर (कर्नाटक), १७ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने खानापूर येथे १६ मे या दिवशी हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. श्रीराम मंदिरापासून चालू झालेल्या या दिंडीची सांगता श्री बसवेश्वर चौक, जांबोटी क्रॉस येथे झाली. या फेरीसाठी सनातन संस्थेचे संत पूज्य शंकर गुंजेकर यांची वंदनीय उपस्थिती होती.
या फेरीमध्ये विश्व हिंदु परिषद संघटनेचे खानापूर तालुकाध्यक्ष श्री.गोविंदराव किरमटे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुभाष देशपांडे आणि श्री. किरण येलुरकर, बजरंग दलाचे जांबोटी विभागप्रमुख श्री. जानोबा शिंदे, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, वारकरी संप्रदाय, हरे राम हरे कृष्ण संप्रदाय, सनातनचे हितचिंतक, साधक यांसह ४७५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. फेरीच्या समारोपप्रसंगी सनातन संस्थेच्या श्रीमती लक्ष्मी गुरव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या हिंदु एकता दिंडीत सहभागी होणारे हिंदू पारंपारिक वेशभूषा परिधान करून नामजप करत, तसेच काही जण भजने म्हणत वारकरी परंपरेचे दर्शन घडवीत होते. राष्ट्रपुरूष, क्रांतीकारक, पराक्रमी हिंदु राजे यांनी केलेल्या महान कार्यातून बोध घेण्यासाठी प्रबोधनही या फेरीत केले होते. या फेरीत विविध संप्रदाय, तसेच हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. काळाची आवश्यकता ओळखून सध्याच्या स्थितीला स्वरक्षण प्रशिक्षण, प्रथमोपचार यांविषयीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आली.
प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी सर्वप्रथम हिंदु राष्ट्राची संकल्पना समाजासमोर मांडली ! – श्रीमती लक्ष्मी गुरव, सनातन संस्था
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सर्वप्रथम हिंदु राष्ट्राची संकल्पना समाजासमोर मांडली. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय असून ते विश्वासाठी मार्गदर्शक ठरेल, हेही त्यांनी लक्षात आणून दिले. तेव्हापासून सहस्रो हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते, देशभरातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना या हिंदु राष्ट्र संघटनेच्या कार्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत आहेत. हिंदु राष्ट्र जागृती अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधना प्रवचनांचे आयोजन करणे, असे उपक्रमही राबवण्यात येत आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे श्रीमती. लक्ष्मी गुरव (नंदिहळ्ळी, बेळगाव) यांनी मार्गदर्शन केले.
* हिंदूंच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत ! – श्री. किरण येलुरकर
याप्रसंगी श्री. किरण येलुरकर म्हणाले, ‘‘आज संपूर्ण भारताला सनातन धर्माची आवश्यकता आहे. हिंदूंच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे. सनातन संस्थेचे कार्य भारतभर कार्य करतांना दिसत आहे. संस्थेचे कार्याला मी नमन करतो.’’
* विशेष
१. दिंडीमध्ये अनेक धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी केली.
२. दिंडीत निंगापूर गल्ली खानापूर येथील झांजपथक सहभागी झाले होते.
* चौकट
सनातन संस्थेच्या साधिका कु. अक्षता बोंगाळे यांनी प्रारंभी अत्यंत भावपूर्ण असे श्रीगणेशवंदन आणि समारोप्रसंगी गुरुवर्णन कृतज्ञता नृत्य सादर केले.