येथील महांतेश नगर मधील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व महाविद्यालयात आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अध्यात्मिक सबलीकरणासाठी दया आणि करुणा या विषयावर पत्रकारांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारी पीस ऑफ माईंड टीव्ही अँकर राजयोगी बिके श्रीनिधी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मकुमारी बेळगाव विभागाच्या संचालिका राजयोगी बि के अंबिका राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत काकतीकर व्हिडिओ जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महेश विजापुरे कर्नाटक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मुरुगेश शिवपुजी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना बीके श्रीनिधी म्हणाले की सध्या सोशल मीडिया च्या काळात पहिल्यांदा बातमी कोण देतो यावर चढाओढ चालली आहे. त्यामुळे आताच्या सोशल मीडिया आणि ऑनलाइन मीडियावर येणाऱ्या फेक न्यूज आजच्या प्रसारमाध्यमांसमोर मोठे आवाहन बनून उभे ठाकले आहे.
पूर्वीची पत्रकारिता इतकी परिणाम होती की न्यायालयाच्या निकालावर देखील त्याचा परिणाम होत असे. पूर्वी पत्रकार जी बातमी देत होते त्यावर लोक आपला निर्णय दृष्टिकोण ठरवत असत मात्र आता सोशल मीडियावर पत्रकारितेवर विपरीत परिणाम झाला असल्याचे मत त्यांनी यावेळी कार्यक्रमात मांडले.
तसेच खोट्या बातम्यांना नागरिकांनी बळी पडू नये आणि पत्रकारांनी देखील या सोशल मीडिया आणि ऑनलाईन मीडियाच्या काळात अचूक आणि खरी बातमी देण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
तसेच यावेळी बोलताना श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे म्हणाले की बातम्यांची सत्यता तपासणे आव्हानात्मक ठरले आहे पत्रकारांकडे समाज आता वेगळ्या नजरेने पाहतो आहे हे चित्र बदलले पाहिजे पत्रकारांनी नकारात्मक बातम्या देणे टाळले पाहिजे तसेच जी सत्य बाजू आहे ती परखडपणे मांडून नागरिकांचा विश्वास जिंकला पाहिजे असे मत यावेळी मांडले.