*युवा समितीच्या वतीने निवेदन*
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सीआरपी कौंसलिंग मध्ये मराठी शाळांवर कन्नड सीआरपी अधिकाऱ्यांची अन्यायकारक नियुक्ती आणि मराठी शाळांमध्ये मराठी शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या कन्नड सक्ती विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांना गुरुवार दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी निवेदन देण्यात आले.
जिल्हाशिक्षणाधिकारी यांच्या अनूपस्थितीत शिक्षणाधिकारी श्री होगार यांनी निवेदन स्वीकारले.
खालील आशयाचे निवेदन जिल्हाशिक्षणाधिकारी याना देण्यात आले.
नमूद विषयाप्रमाणे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील मराठी संपन्नमूल अधिकारी (सीआरपी) कौन्सलिंग वेळी जाणीवपूर्वक मराठी शाळांसाठी कन्नड सीआरपी अधिकाऱ्यांची निवड केली जात आहे या आशयाची बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून निदर्शनास आली.
बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुका या तिन्ही ठिकाणी मराठी शाळांवर कन्नड सीआरपी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे, आणि हे कन्नड अधिकारी मराठी भाषिक शिक्षकांना शाळांची सर्व माहिती आणि कामकाज फक्त कन्नड मध्ये देण्यास भाग पाडत आहेत, त्यामुळे मराठी भाषिक शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाचे हे धोरण म्हणजे मराठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय असून ही एकप्रकारे भाषिक सक्तीच आहे, भारतीय संविधानाचे कलम ३५०/अ नुसार भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षणाचा अधिकार प्राप्त असून या अल्पसंख्याक शाळांसाठी सर्व सोई सुविधा आणि त्यांचे भाषिक अधिकार देणे बंधनकारक आहे, तेव्हा अशी भाषिक सक्ती करणे घटनाबाह्य असून मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक देणे बंद करत भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे.
वरील नमूद तिन्ही ठिकाणी मराठी शाळांमध्ये मराठी भाषिक सीआरपी अधिकाऱ्यांची तातडीने फेरनियुक्ती करण्यात यावी, आणि मराठी भाषिक शिक्षकांना त्यांचे सर्व व्यवहार आणि शालेय कामकाज मराठी भाषेत करण्यात आडकाठी करू नये. जर आपल्या अश्या वागण्याने मराठी शाळांचे आणि भाषेचे भवितव्य धोक्यात आहे असे वाटल्यास आम्हास तीव्र लढा दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या ही विनंती करण्यात आली.
सदर निवेदन देतेवेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रमेश माळवी, किरण मोदगेकर, वासू सामजी, मनोहर हुंदरे, संतोष कृष्णाचे बाबू पावशे आशीर्वाद सावंत आदी उपस्थित होते.
चौकट- प्रत्येक वेळी निवेदन देण्यास गेल्यावर जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी गैरहजर असतात आणि कनिष्ठ अधिकारी निवेदन घेण्यास उत्सुक नसतात, यावेळी तर कनिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन कन्नड किंवा इंग्रजीत स्वीकारले जाईल अशी भाषा करताच युवा समिती कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी मराठी का नको याबाबत लेखी विचारणा केली, तेव्हा कनिष्ठ अधिकारी भांभावले आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाचारन करण्यात आले. वेळोवेळी कोणत्याही कार्यालयात मराठी भाषिकांना त्यांच्या भाषिक अल्पसंख्याक अधिकारांची आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैव आहे.