लेखकाने साहित्याचा कोणताही प्रकार वापरला तरी त्याचा वापर समाजाची नवनिर्मिती आणि फेरमांडणी करण्यासाठी आहे याचे भान लेखकाने बाळगावे असे विचार ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी व्यक्त केले.ते बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन येथील एन. डी.पाटील साहित्य नगरी येथील पहिल्या प्रगतशील लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थाना वरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पाटील, कॉम्रेड भालचंद्र कानगो, प्रा.आनंद मेणसे,कृष्णा शहापूरकर,नागेश सातेरी उपस्थित होते.
प्रारंभी लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर संजय मेणसे लिखित ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल.देशपांडे या पुस्तकाचे आणि सुभाष धुमे लिखित कृष्णा मेणसे यांच्या चरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात देशातील सद्यस्थिती आणि लेखकांची जबाबदारी या विषयावर भालचंद्र कानगो आणि अशोक देशपांडे यांचे व्याख्यान झाले.तिसऱ्या सत्रात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील लेखकांचे योगदान या विषयावर परिसंवाद झाला.या परिसंवादात प्रा. द. तु.पाटील,संपत देसाई,अनिल आजगावकर आणि प्रा.चंद्रकांत वाघमारे सहभागी झाले होते.चौथ्या सत्रात डॉ.नवनाथ शिंदे यांनी संत तुकाराम हा एकपात्री प्रयोग सादर केला.शेवटच्या सत्रात खुले अधिवेशन झाले.संमेलनाला साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.