मद्यपी मंडळी नशा चढली की काय करतील हे सांगता येत नाही.एका तळीरामाला मद्याचा अमल जरा जास्तच झाल्याने त्याने भर रहदारीच्या रस्त्यावर मधोमध चक्क दंड ,बैठका काढून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
बेळगावातील काँग्रेस रोड हा नेहमी गजबजलेला रस्ता.गोवा,खानापूर आणि दांडेलीला जाण्यासाठी या रस्त्यावर नेहमी वाहतूक असते.या रस्त्यावर दुपारी साडे बाराच्या सुमारास एक मद्यपी अचानक अवतरला.त्याने चक्क रस्त्याच्या मधोमध थांबून चढलेली असली तरी तोल सांभाळून भर रस्त्यात वाहनांची ये जा होत असताना दंड मारण्यास सुरुवात केली.मद्यापीच्या या व्यायामामुळे काँग्रेस रोडवर ट्रॅफिक जॅम झाली.आजूबाजूने हॉर्न वाजत असले तरी त्याला त्याचे भानच नव्हते.तो आपला दंड मारण्यात मग्न होता.प्रारंभी लोकांना तो मनोरुग्ण असावा असे वाटले पण जवळ गेल्यावर तो तळीराम असून त्याचे विमान उडाले असल्याचे लोकांच्या ध्यानात आले.नंतर लोकांनीच त्याला अक्षरश उचलून रस्त्याच्या कडेला बसवले आणि काँग्रेस रोड वरील वाहतूक सुरळीत झाली.