शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत आणि बेळगावात सुरू केलेले खासगी जय किसान भाजी मार्केट बंद करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजी विक्री आंदोलन केले.या अगोदर शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर देखील भाजी विक्री करून आंदोलन छेडले आहे.केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती पण तसे काहीच झाले नाही.
शेतकऱ्याच्या उत्पन्नाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.भाजीपाल्याचे दर घसरल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही .कापसाची निर्यात कमी दरात करण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.भाजी विक्री आंदोलन करताना शेतकऱ्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.कोबी,दोडकी,टोमॅटो आदी भाजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विक्रीसाठी आणली होती.