, प्रगतिशील लेखक संघ ही संस्था १ ९ ३६ साली स्थापन झाली . दि . १३ एप्रिल रोजी संस्थेचे अधिवेशन लखनौ येथे झाले . सुप्रसिद्ध लेखक मुन्शी प्रेमचंद हे अध्यक्षस्थानी होते . प्रेमचंद यांनी केलेले अध्यक्षीय भाषण त्यावेळी खूपच महत्वपूर्ण ठरले . आजही ते तितकेच महत्वपूर्ण आहे . स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन तर त्यांनी केलेच शिवाय समाजातील विषमता आणि कुरुपता नष्ट करण्याच्या कामात लेखकांनी भूमिका घ्यावी असा आग्रह धरला . त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिशील लेखक संघाची वाढ झाली . भारतातील जवळजवळ सर्व प्रदेश आणि भाषांतून प्रगतिशील लेखक संघाचे काम सुरु झाले . रविंद्रनाथ टागोर यांनी संघाला पाठिंबा दिला होता . स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रगतिशील लेखक संघ क्रियाशील राहिला आहे . अनेक लेखक या चळवळीत सहभागी झाल्याचे दिसते . यामध्ये शाहीर अमर शेख , अण्णा भाऊ साठे , द . ना . गवाणकर , नारायण सुर्वे , बाबुराव बागुल , प्र . श्री . नेरुरकर ही काही महत्वाची नांवे यांनी तर स्वातंत्र्य लढा , गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही भाग घेतला होता . प्रगतिशील लेखक संघाचे काम बेळगावात अलिकडेच २०१ ९ पासून सुरु झाले . या तीन वर्षाच्या काळात संघटनेने सातत्य राखले आहे . संघाच्या वतीने शनिवार दि . २३ व रविवार दि . २४ एप्रिल २०२२ रोजी बेळगाव शहरात पहिले साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे . आजरा ( कोल्हापूर जिल्हा ) येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा . राजा शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे . संमेलनाचे उद्घाटन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अॅड . राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते होणार आहे . या दोन दिवशीय संमेलनात देशातील सद्यस्थिती व लेखक या संबंधाने विचारमंथन होणार आहे . काव्यवाचन व कवींसाठी कार्यशाळा , विशेष व्याख्यान आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलावंत प्रा . नवनाथ शिंदे यांचा ‘ संत तुकाराम ‘ हा एकपात्री प्रयोग होणार आहे .