श्रीराम नवमी निमित्त सनातन संस्थेचा विशेष लेख !
इतिहास :
श्रीविष्णूचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामाच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी केली जाते. या दिवशी पुष्य नक्षत्रात, दुपारी कर्क लग्नात सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत श्रीरामचंद्राचा जन्म झाला.
महत्त्व :
देवतांच्या आणि अवतारांच्या जन्मतिथीला भूमीवर त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामाचे तत्त्व नेहमीपेक्षा १००० पट अधिक कार्यरत असते. श्रीराम नवमीला ‘श्रीराम जयराम जयजय राम ’हा नामजप तसेच श्रीरामाची इतर उपासना भावपूर्ण केल्याने श्रीराम तत्त्वाचा लाभ घेण्यास साहाय्य होते.
उत्सव साजरा करण्याची पद्धत : अनेक राम मंदिरात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ९ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, हरिकथा आणि रामाच्या मूर्तीला विविध श्रृंगार इत्यादींसह हा उत्सव साजरा करतात.
नवमीला दुपारी रामजन्माचे कीर्तन (हरिकथा) होते. दुपारी कुंची घातलेला नारळ पाळण्यात घालून जोजवतात. भक्त त्यावर गुलाल आणि फुले अर्पण करतात. यावेळी श्रीरामाच्या जन्माची गीते म्हणतात. त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन होते आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्यासह महाप्रसाद देतात.
रामनवमीचे महत्त्व-
त्रेतायुगात रामजन्म झाल्यावर कार्यरत झालेला श्रीविष्णूचा संकल्प, त्रेतायुग कालीन अयोध्यावासींचा भक्ती-भाव आणि पृथ्वीवरील सात्त्विक वातावरणामुळे प्रभु श्रीरामाच्या जन्मामुळे १०० टक्के परिणाम झाला. त्यामुळे दरवर्षी येणार्या चैत्र शुक्ल नवमीला ब्रहमांडातील वातावरणात रामतत्त्व प्रक्षेपीत करून वातावरण सात्त्विक आणि चैतन्यमय होण्यासाठी विष्णूलोकातून श्रीरामतत्त्वयुक्त विष्णुतत्त्व भूलोकाच्या दिशेने प्रक्षेपीत होते आणि त्या दिवशी श्रीरामाचा अंशात्मक जन्म होतो. त्याचा परिणाम संपूर्ण वर्ष राहून ब्रह्मांडात रामतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्याचे प्रक्षेपण होते. राम तत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू ग्रहण करतात आणि त्यातून त्यांना आपले कार्य चांगल्या रीतीने करणे साध्य होते.
रामायणाची उत्पत्ती-
उत्पत्ती आणि अर्थ :
रामायण शब्द रं + अयन या दोन शब्दांनी निर्माण झाला आहे. रं रमयते म्हणजे तल्लीन होणे, साधनेत तल्लीन होणे, अयन म्हणजे सप्तलोक. साधनेत तल्लीन होऊन आनंदात राहून सप्तलोक पार करून मोक्षाला जाण्याविषयी रामायणात सांगण्यात आले आहे. ‘समस्त अयनं रामायणम् ।’ अयन म्हणजे जाणे, मार्ग असा अर्थ होतो. परब्रह्म परमात्मास्वरूप असलेल्या श्रीरामाकडे घेऊन जाणारे, त्याकडे जाण्याची चालना देणारे अथवा स्फूर्ती, उत्साह वाढविणारे, जीवनाचा खरा मार्ग दाखविणारे ते ‘रामायण’आहे.
(सणांविषयी अधिक माहितीसाठी वाचा सनातन संस्था निर्मित ग्रंथ – सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र)
संग्रह
श्री. विनोद कामत
राज्य वक्ता, सनातन संस्था,
(संपर्क : ९३४२५९९२९९)
……………………………………………………………………