बेळगाव, दि.३- रणकुंडये गावात मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून तीक्ष्ण हत्यारांनी तरुणाची हत्या केली.तीक्ष्ण हत्याराच्या घावामुळे जागेवरच तरुणाचा मृत्यू झाला.मृत तरुणाचे नाव नागेश बाबासाहेब पाटील (३२) असे आहे.मृत नागेश हा मर्चंट नेव्हीत होता.अलीकडेच त्याने नोकरीचा राजीनामा देवून दुसरीकडे नोकरीला लागला होता.दुचाकीवरून मध्यरात्री दीड वाजता आलेल्या हल्लेखोरांनी नागेश यांच्या घरासमोर लावलेल्या दुचाकी वाहनांची मोडतोड केली.त्यानंतर घराच्या काचा फोडून घरात घुसून हल्ला केला हल्लेखोर नागेशवर हल्ला करत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेला भाऊ मोहन याच्यावर देखील हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.मोहन याला उपचारासाठी इस्पितळात हलवण्यात आले आहे.मध्यरात्री घरात घुसून बाहेर काढून नागेश याची हत्या केल्याने गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी भेट देवून पाहणी केली.ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनीलकुमार यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.