*भारतीयांचे नूतन वर्ष ‘गुढीपाडवा’
शास्त्रोक्त रीतीने कसा साजरा करायचा *
कोणतीही कृती करण्याआधी ती का करायची ? त्याच्या मागील शास्त्र, इतिहास काय आहे ? हे आपण पाहतो. मग आता सर्व सर्वजण ३१ डिसेंबरला नववर्ष का साजरे करतात ? त्यामागील शास्त्र अथवा इतिहास काय असे तुम्हाला वाटले नाही का ?योग्य कारणे नसतानाही आम्ही पाश्चात्यांचे अंधानुकरण करत ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करतो. रात्री १२ वाजता डिस्को, पबचे कर्कश ध्वनी ‘पिऊन’ नाचणार्या मुलांसह नववर्ष साजरे करणे योग्य आहे, असे तुम्हाला वाटते ? ते पाहून हे खरेच नववर्ष आहे, असे तुम्हाला वाटते ? तुम्हीच याचा विचार करा. दिवसाचा आरंभच अंधारात, दुःखाने व्हावा, असे तुम्हाला वाटते ? हिंदू संस्कृतीनुसार दिवसाचा प्रारंभ पहाटे सूर्याेदयासह होतो.
आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण नववर्ष गुढीपाडव्याला का साजरे करतो हे तुम्हाला समजले का ?
गुढीपाडवा साजरा करण्याचे महत्व आणि त्या मागील कारणे.
सर्व नववर्षारंभामध्ये योग्य वर्षारंभाचा दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. १ जानेवारीला नववर्ष का साजरे करायचे हे सांगणारे कोणतेही कारण नाही. कोणीतरी ठरविले आणि त्याला प्रारंभ झाला. त्याविरुद्ध चैत्र शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
नैसर्गिक कारणे : अनुमाने प्रतिपदेच्या वेळी सूर्य वसंत संपातावर येतो आणि वसंत ऋतुला प्रारंभ होतो. सर्व ऋतूंमध्ये कुसुमाकरी वसंत ऋतु माझीच विभूती आहे, असे भगवंताने श्रीमद्भगवद्गीतेत (१०.३५) सांगितले आहे. यावेळी समशीतोष्ण, आल्हाददायक, उत्साहवर्धक वातावरण असते. शिशिर ऋतूत ङाडांची पाने झडून जातात आणि प्रतिपदेच्यावेळी त्यांना नवीन पालवी फुटत असते. वृक्षवल्ली सुंदर दिसू लागतात.
गुढीपाडव्यापासून प्रारंभ होणार्या नववर्षाचे कालचक्र विश्वाच्या उत्पत्तीच्या कालचक्राशी संबंधित आहे. त्यामुळे ते सृष्टीच्या नवचैतन्याने भरलेले आहे. त्याच्या विरुद्ध ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता प्रारंभ होणारे नववर्ष विश्वाच्या लयकालाशी संबंधित आहे. गुढीपाडव्याला प्रारंभ होणार्या नववर्षाची तुलना सूर्याेदयाला प्रारंभ होणार्या तेजोमय दिवसाशी करू शकतो.
निसर्गानियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मनुष्याला पूरक असतात आणि त्याविरुद्ध केलेल्या गोष्टी मनुष्याला हानीकारक असतात. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नववर्ष प्रारंभ न करता गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्यातच आपले हित आहे.
ऐतिहासिक कारणे : या दिवशी रामाने वालीचा वध केला. विजयाचे प्रतीक देखील उंच असते; म्हणून ब्रह्मध्वज देखील उंच असतो. याच दिवशी शालीवाहन शकाला प्रारंभ झाला. याचे कारण म्हणजे याच दिवशी शालीवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
आध्यात्मिक कारण : ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, अर्थात याच दिवशी सत्ययुगाला प्रारंभ झाला. म्हणूनच या दिवशी नववर्ष साजरे करतात. या दिवशी तेज आणि प्रजापती लहरी अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. सूर्याेदयाच्यावेळी या लहरींमधून प्रक्षेपित होणारे चैतन्य देखील अधिक काळ रहाते. ते जीवाच्या जीवकोशात संग्रहीत होते आणि आवश्यकतेनुसार त्या जीवाकडून त्याचा उपयोग केला जातो.
पाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती :
कोणत्याही सणाला त्या सणाच्या वैशिष्ट्यानुसार आणि आपल्या पद्धतींप्रमाणे आपण काहीतरी करत असतो; परंतु धर्मात सांगितल्याप्रमाण ेअशा पारंपरिक कृतींच्या मागचे अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व देखील आपल्या लक्षात येते. आपण गुडीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृतींची माहिती करून घेऊया.
अभ्यंगस्नान : गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावे. देशकालकथन करावे.देशकालकथनाने अहं न्यू होण्यास साहाय्य होते.
तोरण बांधणे : स्नानानंतर आंब्याच्या पानांचे तोरण सिद्ध करून लाल फुलांसह सर्व दारांना बांधावे; कारण लाल रंग शुभ सूचक आहे. सात्त्विक तोरणामुळे चैतन्य प्रक्षेपीत होऊन संरक्षण कवच निर्माण होते.
पूजा : आधी नित्यकर्म देवाची पूजा करावी. वर्षाच्या पाडव्याला महाशांती करावी. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करावी; कारण ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती. पूजेत त्याला दवणा अर्पण करावा. त्यानंतर होम-हवन आणि ब्राह्मण संतर्पण करावे. त्यानंतर अनंत रूपात अवतरीत झालेल्या श्रीविष्णुची पूजा करावी. ‘नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः।’ हा मंत्र म्हणून त्याला नमस्कार करावा. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. शक्य असल्यास इतिहास, पुराण इत्यादी ग्रंथ ब्राह्मणांना दान म्हणून द्यावेत. हा शांतियज्ञ केल्याने सर्व पापांचा नाश होतो, संकटे येत नाहीत, आयुष्यवृद्धी होते आणि धनधान्याची समृद्धी होते. त्यादिवशी जो वार असेल, त्या वारदेवतेची पूजा करावी.
ब्रह्मध्वज उभारणे :
बांबुच्या उंच टोकाला हिरव्या अथवा पिवळ्या रंगाचा जरीचा खण लावावा. त्यावर बत्ताशांची माळ, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि लाल फुलांचा हार बांधून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा कलश ठेवून ध्वज उभा करतात. त्याच्यासमोर सुंदर रांगोळी काढून ‘ब्रह्मध्वजाय नमः।’ असे म्हणून संकल्पपूर्वक पूजा करावी. दुसर्या दिवसापासून त्या कलशाचा पाणी पिण्यासाठी उपयोग करावा. सूर्यास्ताच्या वेळी गुळाचा नैवेद्य दाखवून ध्वज (गुढी) खाली उतरवतात.
धर्मध्वज (गुढी) उभा करण्याची पद्धत-
१. धर्मध्वजाचे स्थान : धर्मध्वज दाराबाहेर उंबरठ्याजवळ (घरातून पाहिले असता) उजव्या बाजूला उभा करावा.
२. पद्धत :
अ. धर्मध्वज उभा करण्याच्या आधी जमीन शेणाने सारवून घेऊन अंगण रांगोळीने सुशोभीत करावे.ध्वज उभा करायच्या जागेवर रांगोळीने स्वस्तीक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू घालावे.
आ. गुढी उभी करताना ब्रह्मांडातील शिवशक्ती लहरींना आवाहन करून त्यांना स्वस्तिकावर स्थापित करावे. त्यामुळे ब्रह्मध्वजाच्या टोकावर असलेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्त होते.
इ. धर्मध्वज भूमीवर उंबरठ्याजवळ किंचित झुकलेल्या स्थितीत उभा करावा.
अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ – सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र.
आपला विश्वासू
श्री. विनोद कामत
राज्य प्रवक्ता, सनातन संस्था
संपर्क : ९३४२५९९२९९
………………………………..