काकती येथील फेअरफिल्ड मॅरीयट हॉटेलमधून हिरेजडित बांगड्या चोरीला गेल्या असल्याची तक्रार हॉटेलच्या ग्राहकाने काकती पोलीस स्थानकात नोंदवली आहे.साधारण नऊ ते दहा लाख रुपयांच्या हिरेजडित बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिप्रा बिजावत,कंट्री एच आर हेड , ओलम ॲग्री इंडिया प्रा.ली.गुडगाव,हरियाणा यांनी सदर तक्रार नोंदवली आहे.फेअरफिल्ड मॅरीयट या प्रतिष्ठित हॉटेल मधून चोरी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शिप्रा बिजावत या १५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता हॉटेलमध्ये आल्या.त्यांना २१९ नंबरची खोली देण्यात आली होती.नंतर त्या आपल्या कामानिमित्त रजगोळी, ता.चंदगड येथील साखर कारखान्याला भेट देण्यासाठी गेल्या होत्या.रात्री साडे दहा वाजता त्या आपल्या खोलीवर परतल्या.त्यावेळी आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी खोलीत येवून गेल्याचे ध्यानात आले.त्यांनी आपले सामान तपासले असता नऊ ते दहा लाख रु.च्या रत्नजडित बांगड्या चोरीला गेल्याचे समजले.त्याशिवाय खोलीतील शॉवर वापरल्याचे देखील ध्यानात आले.वापरलेला ओला टॉवेल देखील खुर्चीवर ठेवण्यात आला होता.
आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी आपल्या खोलीत येवून गेल्याचे आणि हिरेजडित बांगड्या चोरीला गेल्याचे त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाला सांगितले .पहीलेंदा हॉटेल व्यवस्थापनाने असे काही घडल्याचा इन्कार केला.पण नंतर दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत एका जोडप्याला खोली वापरायला देण्यात आल्याचे सी सी टी व्हि फुटेज पाहून कबूल केले.
.नंतर शिप्रा बिजावत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच येवून खोलीची पाहणी करून तपासाला प्रारंभ केला.
घडलेल्या घटनेमुळे आपल्याला रात्रभर भीतीने झोप लागली नाही.पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.एकटी महिला येवून हॉटेल मध्ये राहणे असुरक्षित असल्याचे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले .