‘ऑपरेशन मदत’द्वारे शैक्षणिक साहित्याची मदत
ऑपरेशन मदतचे कार्यकर्ते दुर्गम भागातील धनगरवाड्यात शैक्षणिक साहित्य देऊन मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने कार्यकर्त्याने चंदगड तालुक्यातील घनदाट जंगलातील जंगमहट्टी धनगर वाडा येथील शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.विद्यार्थाच्या मनात शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी त्यांना वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर व शार्पनर देण्यात आले.
तसेच स्थानिक शाळेसाठी 1 हिरवाबोर्ड, 1 डस्टर आणि 1 जंबो चॉकबॉक्स एसडीएमसीचे अध्यक्ष व शिक्षक लक्ष्मण शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आनंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले, छावणी प्राथमिक विद्यालय बेळगावचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी ‘ऑपरेशन मदत’ द्वारे ग्रामीण शिक्षण अभियान का राबवले जात आहे याची माहिती उपस्थितांना दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रकल्पासाठी डॉ. केतकी पावसकर, डॉ. शंतनू पावसकर आणि दीपक औळकर यांनी सहकार्य केले. प्रसाद हुली, जगदीश गस्ती, गौतम श्रॉफ, संजय साबळे यांनी सहकार्य केले. यावेळी स्वराज्य बिर्जे (वय 3 वर्षे), शार्दुल साबळे, विहान पाटील, सिद्धू हगर्णावर, आर्या साबळे आणि सुप्रिता हगर्णावर (13 वर्षे) हे विशेषत: उपस्थित होते.
राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, दिलेल्या पेन्सिल वापरून झाल्या की त्या शेवटी जमिनीत पुरवा .या पेन्सिलीमध्ये वनस्पतीचे (भाज्या, फळ किंवा फुलांचे) बीज आहे , जे पेन्सिलच्या मागील टोकाच्या आत आहे , त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीचे महत्त्व ओळखून भविष्यात आपणही त्यानुसार शेतात मशागत केली पाहिजे असे सांगून मार्गदर्शन केले .