कर्नाटकात नववी , दहावीच्या शाळा आणि कॉलेज कडक पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याची घोषणा कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केली आहे.
हिजाब वरून सुरू झालेल्या वादामुळे कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजना तीन दिवस सुट्टी देण्यात आली होती.पण आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा,कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये सोमवारी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलीस खात्याला देण्यात आल्या आहेत.संवेदनशील, अति संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे देखील गृहमंत्र्यांनी बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेले तीन दिवस शाळा बंद असल्या तरी शाळा आणि कॉलेज परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सध्या उच्च न्यायालयाने केवळ गणवेश परिधान करून शाळा,कॉलेजला जावे असा आदेश बजावल्याचे त्या नुसार शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश घालून जावे लागणार आहे.