राज्य सरकारचे आश्वासन देऊन पाठ फिरविण्याचे काम
बेळगाव: कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या नर्स आणि परिचारिकांना राज्य सरकार तर्फे भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली तरी देखील नर्स परिचारिकांना कोविड भत्ता देण्यात न आल्याचे बीम्सच्या परिचारिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने मंजूर केलेला कोविड भत्ता त्वरित देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
आज कर्नाटक राज्य सरकारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या शुश्रूषाधिकारी संघाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पत्रकार परिषदेत कोविड भत्ता त्वरित देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता तसेच कुटुंबियांचा विचार न करता हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा केली. यावेळी सरकारने कोविड भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते मात्र राज्य सरकारने आश्वासन देऊन ते करण्याकडे पाठ फिरवल्याने परिचारिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
कोरोना काळात परिचारिकांनी केलेल्या कार्यासाठी प्रोत्साहन मिळावे. तसेच शासनाने कोविड भत्ता लवकरात लवकर द्यावा. अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेत संघाचे प्रधान सचिव तनवीर अहमद खजिनदार सुधीर नायक उपाध्यक्ष विद्याश्री बजंत्री मनीषा कामत हरीश चिगरे आदी उपस्थित होते.