म्हणून यांनी टाकला येणार्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार
बेळगाव: कैवल्य नगर गौंडवाड मध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांच्या वतीने येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे.सदर समस्येचे निवेदन ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे आणि कैवल्य नगर येथील रहिवाशांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
गेल्या 27 ते 28 वर्षापासून बी के कंग्राळी ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या कैवल्य नगर गौंडवाड मध्ये विद्युत पुरवठा देण्यात नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. या भागात जवळपास वीस ते पंचवीस घरे आहेत. या सर्व कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीला अनेक वेळा सांगून देखील त्यांनी ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या भागात वीज पुरवठा नसल्याने सर्व मुलांना अंधारात बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या भागात विद्युत पुरवठा करण्याची नितांत गरज आहे.मात्र ग्रामपंचायतने ही बाब सोडविण्याकडे दुर्लक्ष केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाग्यज्योती योजनेअंतर्गत या भागात दोन विद्युत खांबे मंजूर झाले होते. मात्र दोन वेळा याठिकाणी विद्युत खांब आणून देखील ते बसविण्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. तसेच या भागात रस्तादेखील नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. येथील रस्ता मंजूर झाला असताना देखील त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते बांधकाम रस्त्यात केले असल्याने ग्रामपंचायत रस्त्याचे बांधकाम करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे याचे नेमके कारण काय हे शोधून काढणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत यांच्या मनमानी कारभारामुळे येथील नागरिकांना रस्ता पासून वंचित राहावे लागले असल्याची तक्रार यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच पावसाळ्यात येथील भागात चिखलाचे साम्राज्य पसरते. तसेच रात्रीच्या वेळी अंधारातून जाताना अनेक अपघात देखील घडतात.
निवडणुकीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य मते मागण्यासाठी येतात . आणि रस्ता करून देऊ असे आश्वासन देऊन जातात. मात्र निवडून आल्यावर कोणी या भागात फिरकून देखील पाहत नाही. या सर्व समस्येला कंटाळून कैवल्य नगर येथील रहिवाशांनी आताच्या येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
जोपर्यंत या भागातील रस्त्याची समस्या आणि विद्युत पुरवठ्याची समस्या सोडविली जात नाही. तोपर्यंत आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.