२७६ जवानांचा शानदार शपथविधी आणि दीक्षांत समारंभ पार पडला
मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २७६ जवानांचा शानदार शपथविधी आणि दीक्षांत समारंभ पार पडला.डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे ब्रिगेडियर एम.एस.मोखा हे दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तिरंगा ध्वज आणि रेजीमेंटचा ध्वज यांच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी शपथ घेतली.मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करण्याची शपथ जवानांनी घेतली.
मराठा लाईट इन्फन्ट्री ही भारतीय लष्करातील जुन्या रेजिमेंटपैकी एक असून या रेजिमेंटला शौर्याची परंपरा आहे.ही परंपरा टिकवण्याची जबाबदारी प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत दाखल झालेल्या जवानांची आहे.शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती या दोन्ही गोष्टी सैनिकाच्या जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत.प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या प्रशिक्षणाचा सेवा बजावताना उपयोग होणार आहे.नेहमी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवा असे आवाहन ब्रिगेडियर एम.एस. मोखा यांनी जवानांना मार्गदर्शन करताना काढले.
यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. संचलनाचे नेतृत्व मेजर डी.एस.राठोड आणि धरम विशाल माताजी यांनी केले.आकाश राजेश परदेशी याला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्कार देण्यात आला.मराठा लाईट इन्फन्ट्रीचे ब्रिगेडियर रोहित चौधरी ,अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी जवानांचे कुटुंबीय दीक्षांत समारंभाला उपस्थित होते.