राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेकायदेशीररीत्या सुरू केलेल्या हलगा माच्छे बायपास रस्त्याच्या कामाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात साठलेल्या पाण्यात अर्धनग्न अवस्थेत थांबून आंदोलन केले.
उच्च न्यायालयाचा काम सुरू करण्यास मनाई आदेश असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पोलिसी बळाचा वापर करून सुपीक जमिनीतून बायपास रस्त्याचे काम सुरू केले आहे.वर्षातून तीन पिके देणाऱ्या जमिनीतून बायपास रस्ता करू नये म्हणून शेतकरी संघटित होवून लढा देत आहेत पण कोणतीही वर्क ऑर्डर नसताना रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.काम सुरू झाल्यापासून दररोज शेतकरी तेथे जावून आंदोलन करत आहेत.सध्या पावसामुळे बायपास रस्त्याचे काम सुरू असलेल्या शेतात पाणी साठले आहे.या साठलेल्या पाण्यात शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत ऊभे राहून आंदोलन केले.यावेळी जय जवान जय किसान , जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची,देणार नाही देणार नाही आमची जमीन देणार नाही,बेकायदेशीररीत्या सुपीक जमीन ताब्यात घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिल्या.