जागेचा मुद्दा अद्याप प्रलंबित
बेळगाव: झेंडा चौक मार्केट येथे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना म .फुले भाजी मंडई येथे स्थलांतरीत करून नूतन इमारत उभी करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे . या संदर्भात गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला . मनपाच्या पथकाने या गाळ्यांचे हस्तांतरण करून विक्रेत्यांना तेथे जाण्याची सूचना केली .
परंतु यामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणाचे संपूर्ण निकालपत्र नसल्यामुळे हा उपलब्ध प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरला . याठिकाणी वादंग उद्भवण्याची शक्यता असल्याने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . पोलीस बंदोबस्तात मनपाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला . मात्र , यावर पुन्हा चर्चेचे गुन्हाळ सुरू राहिले आहे .
झेंडा चौक येथील कांदा मार्केटच्या ठिकाणी भव्य संकुल उभे करण्याचा प्रस्ताव आहे . मात्र , यामध्ये वक्फ मंडळ , जागा मालक इनामदार कुटुंबीय आणि मनपा यांच्यातील प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत . मनपाकडून सदर जागेचा निकाल लागला असल्याचे सांगितले जात आहे . परंतु त्याची प्रत या संबंधित संस्थांना मिळालेली नसल्याचा मुद्दा पुढे करून चर्चेला पूर्णविराम दिला जात आहे . याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले . त्यामुळे मनपा यंत्रणेला आपला प्रयत्न पुन्हा एकदा स्थगित करावा लागला .