विषप्राशन करून इसमाची आत्महत्या
बेळगाव :गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास बबनवाडी गावानजीक एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यावेळी गावकऱ्यांनी लागलीच मृतदेह पाहून माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि त्यांचे चिरंजीव अॅलन मोरे यांच्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ विजय मोरे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी सदर मृत व्यक्तीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तसेच तो व्यक्ती बैलहोंगल गावातील असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तातडीने मृत व्यक्तीच्या कुटुंबाशी पोलिसांनी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
त्यामुळे मृत व्यक्तीचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत पोलिसांनी तेथेच राहून आवश्यक ती खबरदारी घेतली. आणि नातेवाईक आल्यानंतर सदर मृत व्यक्तीचा मृतदेह सकाळी 8 वाजता शवागरात हलविला. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पेट्रोलिंग पोलीस, ग्रामपंचायत सदस्य संजय अनबर, ग्रामपंचायत सदस्य पुंडलीक दुखणे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.