बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बोरगल गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
वडील,तीन मुली आणि एक मुलगा अशा एकच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने बोरगल गावावर शोककळा पसरली आहे. निवृत्त जवान गोपाळ हादीमनी याची पत्नी जया हीचे दोन महिन्यापूर्वी ब्लॅक फंगसने निधन झाले होते. गोपाळ याला पत्नी निधनाचा धक्का बसला होता.तेव्हापासून गोपाळ दुःखी होता.पत्नी निधनामुळे नैराश्येतून गोपाळ याने स्वतः आणि मुलांना विष प्राशन करायला लावून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गोपाळ हादीमनी (४६),मुलगी सौम्या (१९),स्वाती (१६),साक्षी (१२) आणि मुलगा सृजन (१०) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.आत्महत्येचे वृत्त कळताच त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच संकेश्र्वर पोलिसांनी बोरगल गावात जावून पंचनामा केला.नंतर मृतदेह पोस्टमोर्टेंम साठी स्थानिक हॉस्पिटलला नेण्यात आले.संकेश्र्वर पोलीस स्थानकात या आत्महत्या प्रकरणाची नोंद झाली असून एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या करण्या मागचे कारण काय असावे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.