येथील नागरिक सुज्ञ होतील का?
बेळगाव :नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिराची सजावट करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र येथील कोतवाल गल्लीतील मंदिरासमोर या नवरात्र उत्सवाच्या काळात कचरा टाकण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
कोतवाल गल्लीतील नागरिक आणि येथील भाजी विक्रेत्यांमुळे सदर परिस्थिती उद्भवली आहे. आपल्या घरातील कचरा महापालिकेच्या घंटागाडी कडे देण्याऐवजी मंदिराच्या समोर अस्ताव्यस्तपणे टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच भाज्यांचा पालापाचोळा देखील याच ठिकाणी टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
भटकी जनावरे आणि कुत्री अन्नाच्या शोधात येथील कचरा विस्कटत आहे. त्यामुळे परिसरात आणखीनच गलिच्छ बनत आहे. तसेच महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे पाहायला मिळत आहे.
येथील नागरिकांनी देखील आपल्या घरातील कचरा रस्त्यावर न टाकता पालिकेच्या घंटागाडी कडे सुपूर्द करावा अथवा कचराकुंडीत टाकावा. तसेच महापालिकेने येथील कचर्याची उचल वेळेवर करावी आणि परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी होत आहे.