रोडचे काम त्वरित पूर्ण करा
बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील महादेव रोडचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले आहे. तसेच येथील रोडच्या दोन्ही बाजूने गटार करण्यात आली आहे. मात्र गटारीतील सर्व सांडपाणी एकाच बाजूला सोडण्यात आल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
येथील गटारीचे सर्व सांडपाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या बाजूने वाहत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गटार ओव्हरफ्लो होऊन लोकांच्या घरात सांडपाणी शिरत आहे. येथील आंबेडकर गल्लीतील दोन-तीन घरांमध्ये सांडपाणी शिरत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
त्यामुळे सदर कंत्राटदाराने याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा पाटील यांनी केली आहे.