उद्यापासून सहावी ते दहावी पर्यंतची शाळा सुरु
शिक्षण खात्याने दिला हिरवा कंदील
बेळगाव :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली शाळा आता दिवसभर चालू करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कोरोना विषाणूची लागण विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी सरकारने शाळा बंद ठेवून ऑनलाईन क्लासेस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्व विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन क्लासच लाभ घेत होते. मात्र आता कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने कर्नाटक शिक्षण खात्याने शाळा पूर्णवेळ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून हिरवा कंदील दाखविला आहे.
4 ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सकाळी दहा ते साडेचार या वेळेत सुरू करण्यात येणार आहे. सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही मुभा देण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. मात्र पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यास कोणताही निर्णय झाला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच कोरोनाची भीती असल्याने अद्यापही शाळांमध्ये माध्यान्ह आहार सुरू करण्याची परवानगी देण्यात न आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नववी आणि दहावी चे वर्ग 23 ऑगस्ट पासून सुरू झाले होते. तर आता 4 ऑक्टोबर पासून सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग दिवसभर सुरू करण्याचा निर्णय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश आणि आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी घेतला आहे.