बेळगाव: दसरा उत्सव संदर्भात मार्केट पोलिस स्थानकामध्ये शहर देवस्थान कमिटी आणि चव्हाट गल्ली देवदादा सासन काठी कमिटी तसेच नवरात्रोत्सव साजरी करणारी मंडळी यांची बैठक शुक्रवारी पार पडली.
या बैठकीत कोरोनाचे संकट अद्याप असल्याने मागील वर्षीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीला फाटा न देता साधेपणाने दसरोत्सव साजरा करण्याची सूचना करण्यात आली.
गेल्या वर्षी मोजक्याच जणांचे उपस्थित विद्यानिकेतन येथील मैदानावर दुपारी बाराच्या सुमारास सीमोल्लंघन पार पडले. अशाप्रकारे यावर्षीही साध्या पद्धतीत यंदाचेही सीमोल्लंघन पार पाडण्यात यावे. असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. तसेच कोरोना संदर्भातील सरकारी मार्गदर्शक सूचीचे काटेकोरपणे पालन करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.
त्याबरोबरच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे आयोजित करण्यात येणारी दौड ही मोजक्याच दहा जणांचे उपस्थित पार पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद कार्यक्रमालाही शासनाने निर्बंध घातले आहेत.
या बैठकीस खडे बाजारचे एसीपी चंद्रप्पा, यांच्यासह शहरातील सर्व पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, देवदादा सासन काठीचे सदस्य, यांच्यासह विविध मंदिराचे प्रतिनिधी, आणि नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.