_*‘हिंदुत्व हाच विश्वबंधुत्वाचा खरा आधार’ या विषयावर आयोजित विशेष संवाद !*_
*हिंदु संस्कृतीने विश्वबंधुत्वाचा, तर अन्य संस्कृतीने 9/11 ला विश्व विध्वंसाचा संदेश दिला !* – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि प्रवचनकार
128 वर्षांपूर्वी 9/11 ला अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदु संस्कृती ही विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी असल्याचे दाखवून दिले होते, तर त्याच अमेरिकेत 20 वर्षांपूर्वी 9/11 ला आतंकवादी आक्रमण करून अन्य संस्कृती विश्व विध्वंसाचा संदेश देणारी आहे, हे समोर आले होते. हा दोन्ही संस्कृतींमधील फरक आहे. आज अफगाणिस्तानात तालिबान्यांकडून महिलांना कशी वर्तणूक दिली जाते, हे आपण पाहतो आहोत. जगभरातील ज्या 85 आतंकवादी संघटना आहेत. त्यात प्रामुख्याने इस्लामी, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट विचारधारेच्या संघटना आहेत. यात एकही हिंदु संघटना नाही. जगातील चौथी सर्वांत मोठी लोकसंख्या हिंदूंची आहे. काश्मिरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित केल्यावरही त्यातील एकही व्यक्ती आतंकवादी झाला नाही; कारण हिंदू सहिष्णु आहेत. हिंदूंनी कधी कोणाच्या गळ्यावर तलवार आणि हातात धर्मग्रंथ घेऊन धर्मविस्तार केला नाही. ‘संघर्ष नको, सहकार्य हवे’, ‘नाश नको, स्वीकार हवा’, ‘विसंवाद नको, संवाद हवा’, या त्रिसूत्रीच्या आधारे हिंदु धर्म विश्वबंधुत्वाची प्रेरणा देतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदुत्व हाच विश्वबंधुत्वाचा खरा आधार’ या विषयावरील ऑनलाईन ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, हिंदु धर्म विश्वबंधुत्वाचे आचरण आणि शिकवण देत असतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदु धर्मांच्या विरोधात ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद आयोजित केली जात आहे. त्यात एकही वक्ता हिंदु धर्माचा अभ्यास असणारा नाही. सर्वजण डाव्या विचारांचे वक्ते सहभागी आहेत. यात भारतातील आयेशा किडवई, आनंद पटवर्धन, बानु सुब्रह्मण्यम, मोहम्मद जुनैद, मीना कंदास्वामी, नेहा दीक्षित आदी सहभागी आहेत. अशी परिषद ते हिंदूंच्या विरोधात घेऊ शकतात. यातून हिंदु सहिष्णु आहेत, हेच सिद्ध होते. अन्य धर्मीयांच्या विरोधात अशी परिषद घेण्याची हिंमत डाव्यांमध्ये आहे का ? त्याचे काय परिणाम होतात, हे ‘चार्ली हेब्दो’वरून समोर आहेत. या हिंदुविरोधी परिषदेमुळे उलट हिंदु समाज हा आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित होत आहे. डाव्यांना केवळ वाद निर्माण करण्याची सवय आहे. त्यांना वादाचे निवारण करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या रशियासारख्या मोठ्या देशाचे तुकडे-तुकडे झाले आहेत. अनेकांचा आवाज दाबणार्या चीनचेही उद्या तुकडे-तुकडे होण्याची शक्यता आहे. इतरांना वैचारिकता आणि लोकशाही यांचा उपदेश देणार्या डाव्यांच्या देशात लोकशाही कुठे आहे ? नेहमी हिटलरचे उदाहरण देणारे डावे हे का सांगत नाही की, हिटलरपेक्षा डाव्या विचारधारेच्या स्टॅलिनने जास्त लोकांना मारले आहे. स्टॅलिनन 2 कोटी लोकांना मारले, तर माओने 3 कोटी चीनी लोकांना मारले आहे. हे सत्य लोकांपर्यंत गेले पाहिजे, असेही डॉ. शेवडे या वेळी म्हणाले.
आपला नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
संपर्क : 99879 66666