श्रावणातील शेवटचा शुक्रवार उत्साहात साजरा
बेळगाव:शहरातील सर्व मंदिरांमध्ये श्रावणी शुक्रवार निमित्त देवीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. समादेवी गल्ली, बसवाण गल्ली, कालिका देवी, आणि नाथ पै सर्कल येथील अंबाबाई मंदिरात देवीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून देवीचे दर्शन घेण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळ पासूनच मंदिरात शेवटच्या शुक्रवारच्या निमित्ताने देवीची ओटी भरण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसर नारळ, फुले आणि पूजेच्या साहित्याने बहरला होता. यावेळी सकाळी मंदिरात देवीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर तिची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. यावेळी सायंकाळी महिला वर्गाने श्रावणातील शेवटचा शुक्रवार असल्याने आपल्या घरी सुहासनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम ठेवला होता. तसेच सकाळी सर्व महिलांनी देवाऱ्यावर देवीचे पूजन केले.
तर काहींनी सुगडावर नारळ ठेवून हळद कुंकू आणि नथ, साडी दागिने घालून देवीला सजविले. तसेच पाच प्रकारची फळे ठेवून आरती करून तिची पूजा केली आणि नैवेद्य दाखविला.यावेळी महिलांनी श्रावणातील शेवटचा शुक्रवार उत्साहात साजरा केला.